हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे नाते तर संपूर्ण सिनेसृष्टीपासून इतर सगळ्यांनाच माहित आहे. या नात्यामुळे आजपर्यंत अनेकदा अर्जुन आणि मलायकाला सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कुणी त्यांच्यातील वयाच्या अंतरावर बोट ठेवलं तर कुणी मलायकाच्या घटस्फोटित असण्यावर भाष्य केलं. पण एकंदरच काय कि, या नात्यामुळे केवळ आणि केवळ लोकांची बोलणी, टोमणे आणि मनस्ताप यांना सहन करावा लागला आहे. अखेर एका वाहिनीशी बोलताना मलायकाने यावर मौन सोडले आणि संताप व्यक्त करत आपला समाज स्त्री द्वेष्टा आहे असे म्हटले आहे.
आतापर्यंत अर्जुन आणि मलायका यांनी आपल्या नात्यावर होणाऱ्या ट्रोलिंगला नेहमीच सडेतोड उत्तरं दिली आहेत. मात्र नुकत्याच ‘हॅलो’ या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने कमी वयाच्या मुलाला डेट करण्याबद्दल आणि घटस्फोटानंतर स्वतंत्र महिला म्हणून जगण्याबद्दल भावना व्यक्त केली आहे. दरम्यान आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाला डेट केलं की, स्त्रीचं पावित्र्यभंग झाल्यासारखी वागणूक तिला समाज देतो असे तिने म्हटले आहे. वयाने लहान असलेला पार्टनर मिळाला की पुरुषाला वेगळी आणि महिलेला वेगळी वागणूक दिली जाते कारण, आपला समाज हा स्त्रीद्वेष्टा असल्याचं तिने म्हटलं आहे.
‘हॅलो’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली कि, “ब्रेकअप वा घटस्फोटानंतर आपलं स्वतंत्र आयुष्य असणं एका महिलेसाठी खूप महत्त्वाचं असतं. मात्र महिलांच्या रिलेशनशिप्सबद्दल आपला समाज हा स्त्रीद्वेष्टा आहे. आपल्या वयापेक्षा लहान पुरुषाला डेट करणं म्हणजे महिलेचा पावित्र्यभंग झाला असंच इथे मानलं जातं. माझ्या आईने मला नेहमीच स्वतंत्रपणे आणि स्वत:च्या मर्जीने जगण्याचं शिकवलंय. जेव्हा माझा संसार मोडला, तेव्हा मी पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये येईन असं वाटलं नव्हतं. माझा पुन्हा प्रेमभंग झाला तर कशी सावरू अशी चिंता मला होती. पण मलासुद्धा प्रेमाची, माझी काळजी घेणाऱ्या व्यक्तीची आणि एका नात्याची गरज होतीच. या नव्या नात्याने माझ्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण केला.”
मलायका आणि अरबाज १९९८ साली लग्न बंधनात अडकले होते. यानंतर जवळपास १८ वर्षांच्या संसारानंतर २०१६ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना १९ वर्षांचा मुलगा आहे. ज्याचे नाव अरहान आहे. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करू लागले. यानंतर २०१९ साली अर्जुनच्या वाढदिवशी त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. दरम्यान मलायका आणि अर्जुन यांच्यामधल्या वयाचा मोठा फरक आहे. मलायका ४८ वर्षीय तर अर्जुन ३६ वर्षांचा असल्यामुळे त्यांच्यात तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे आणि हे एव्हढंच ट्रोलर्सला पुरेसे आहे.
Discussion about this post