Take a fresh look at your lifestyle.

अभिनंदन! मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना कलागौरव पुरस्काराने गौरवणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर हे सध्या सोशल मीडियासह अन्य स्तरांवरही चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा दर्जेदार अभिनय आणि बोलकी लेखणी यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांचे कलाक्षेत्रातील अमूल्य योगदान आणि कलेविषयी असणारी आस्था पाहता त्यांना कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याआधीदेखील चिन्मय मांडलेकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे हा आणखी एक सन्मान त्यांच्या नावे जाहीर होणे हि बाब अतिशय अभिमानास्पद आहे.

पुणे – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे या प्रेक्षागृहात येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. संबंधित माहिती हि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली आहे. माजी शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कार वितरण करण्याच्या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर हे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची नाट्य व चित्रपट सृष्टीतील वाटचालीविषयी एक प्रकट मुलाखत घेणार आहेत. ‘प्रवास चिन्मय मांडलेकरांचा’ असे या सेशनचे शीर्षक आहे.

‘प्रवास चिन्मय मांडलेकरांचा’ या प्रकट मुलाखतीदरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकर हे काही विशेष आणि प्रेक्षकांना माहित नसणाऱ्या बाबींविषयी प्रश्न विचारतील. तसेच कलाक्षेत्रातील वाटचाल, यशाची शिखरे आणि स्वप्नपूर्ती या विषयांवरही प्रश्न उत्तरे केली जातील.

या सोहळ्यात पिंपरी- चिंचवड शहरातील लेखक व दिग्दर्शक आकाश थिटे, थिएटर आर्टिस्ट रश्‍मी घाटपांडे, संगीतकार तेजस चव्हाण, गायक निषाद सोनकांबळे, रविंद्र कांबळे, अभिनेत्री प्रगल्भ कोळेकर यांना या दिग्गजांनादेखील कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहितीनुसार, या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र कार्यवाह डॉ. प्रवीण दाबडघाव, पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी हे पाहुणे प्रमुख उपस्थिती दर्शवितील.