Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे खिकी..! मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. मुक्ताचा जन्म १७ मे १९७९ रोजी पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे झाला. आज मुक्ता आपला ४२वा वाढदिवस साजरा करतेय. तिने आजपर्यंत अनेक हिट मराठी चित्रपट दिले. त्यातील मुंबई- पुणे- मुंबई या चित्रपटाने तर मुंबईकर आणि पुणेकर यांचा संगमच जणू दर्शविला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशी दिसला होता. स्वप्नील आणि मुक्ताची मैत्री फार जुनी आणि अनंत आहे. मुक्ताच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नीलने अशीच एक खास पोस्ट केली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीने मुक्ताच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर तिच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते दोघेही गप्पा मारताना दिसत आहेत. तर दोघेही मुक्त आणि निखळ हसतानादेखील दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्वप्नील जोशीने लिहिले कि, खूप कमी माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही इतकं निरर्थक पण मनमोकळ हसू शकता ! भाग्यवान कि आमच्यासह मार्ग पार केलात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खिकी !!! प्रेम भरपूर आज आणि नेहमीच.

खरतर मुक्ताच्या कुटुंबाचा आणि अभिनय क्षेत्राचा काहीच संबंध नाही. तिचे वडिल टेलिकॉम कंपनीत नोकरीला होते. तर आई शाळेत शिक्षिका. पण मुक्ताला मात्र अभिनेत्री व्हायचे होते. तिने शाळेत अनेक नाटकात काम केले. पण दहावीनंतर तिने पूर्णवेळ अभिनय करायचा असा निर्धार केला. तिने पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ललित कला केंद्रात अभिनयाचे धडे गिरवले. थिएटर विषयात पदवी आणि ‘ड्रामा’ या विषयातून तिने बॅचलर डिग्री मिळवली. यानंतर मुक्ताने पुणे सोडले आणि मुंबई गाठली. १९९९ साली ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात आपले शुभ कदम ठेवले.

घडलंय- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये मुक्त विविध भूमिकांमधून झळकली. मात्र तिची ‘अग्निहोत्र’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. छोट्या पडद्यावर मिळालेल्या या यशानंतर तीची गाडी चित्रपटांकडे वळली. २००२ मध्ये मुक्ताने ‘चकवा’ हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटानंतर थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई – २, डबल सिट असे एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट मुक्ताने मराठी सिने सृष्टीला दिले.

एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिके दरम्यान घना आणि राधा अर्थात स्वप्नील आणि मुक्ताची जोडी चांगलीच गाजली. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातीलही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडली. पुढे ‘जोगवा’ ह्या चित्रपटातील मुक्ताची जोगतीणीची भूमिका मनामनाला भिडली. खरतर जोगवा ही मुक्ताची अप्रतिम कलाकृती आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. या चित्रपटातीळ भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.