Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राबाहेर मालिकांचे चित्रीकरण, आपल्याच सहकाऱ्यांच्या उपासमारीचे कारण; अमेय खोपकर यांनी निर्मात्यांची केली कानउघाडणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिणामी शासनाला नियमांचे बंधन कडक करणे गरजेचे झाले. यामुळे मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण आणि चित्रपटगृह यावर रोख बसविण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या नुकसानाकडे पाहता व प्रेक्षकांच्या मनोरंजनात अडचण येईल हे समजताच निर्मात्यांनी राज्याबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. या आधी फक्त हिंदी मालिकांनी आपले बस्तान महाराष्ट्राबाहेर हलविले होते. मात्र आता त्यांच्या मागोमाग मराठी मालिकांच्या टीमने देखील स्थलांतर केल्याचे दिसत आहे. यामुळे बऱ्याच तंत्रज्ञांचे तसेच टीममधील इतर कामगारांचे काम हिरावले गेले आहे. त्यांची बाजू मांडत मनसे चित्रपट सेनेने निर्मात्यांना आरसा दाखविण्याचे काम केले आहे.

शासनाने राज्यात चित्रीकरण कारण्यावर बंदी आणताच अनेक मालिकांचे चित्रीकरण ज्या राज्यात चित्रीकरणासाठी परवानगी आहे, अश्या ठिकाणी करण्यात येत आहे. अनेक हिंदी मालिकांसोबत आता मराठी मालिकांनी देखील गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इतर कामगारांना होणाऱ्या नुकसानबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड नुकसान होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. म्हणजे एकंदर काय तर टीमचा निर्णय तुमच्याच सहकाऱ्यांच्या पोटाला चिमटा काढण्याचे काम करीत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

अमेय खोपकर यांनी या निर्णयाबाबत नुकतेच ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले की, हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण राज्याबाहेर म्हणजेच गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होत आहे. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’ घरीच बसवून वाऱ्यावर सोडून देण्यात आलंय. रंजक वळणावर असलेल्या मालिकांचा प्रेक्षक दुरावू नये याची काळजी करतानाच आपल्याचं सहकार्यांची उपासमार करतोय याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे, असे म्हणत अमेय खोपकर यांनी निर्मात्यांची कानउघाडणी केली आहे.