माझं नाव खान आहे आणि म्हणूनच..; ’83’च्या दिग्दर्शकाने सांगितली व्यथा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ’83’ यांसारख्या दमदार चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून नावाजलेले दिग्दर्शक कबीर खान यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते ट्रोलिंग विषयी बोलताना अगदी दिलखुलास व्यक्त झाले. काही अंशी संताप व्यक्त केला तर काही अंशी दुःख आणि अगदी खंत देखील कबीर खान यांनी व्यक्त केली. दरम्यान बोलताना कबीर म्हणाले की, सिनेमातील देशभक्ती आणि राष्ट्रवाद या दोन गोष्टींमध्ये फरक असून देशावरील प्रेम दाखवताना त्याला कोणत्याही ‘काऊंटर पॉईंट’ची गरज नसते. याशिवाय आपण खान असल्यामुळे अनेकांनी त्याला पाकिस्तानला जा म्हटल्याचे वाईट वाटल्याचेही खान यांनी सांगितले.
या मुलाखतीत बोलताना कबीर खान म्हणाले की, “आदर आणि प्रेमापोटी १० वर्षांपूर्वी एखाद्याला काय वाटत होतं ते तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगता येत नव्हतं. पण आज स्वतःच्याच शब्दांची जबाबदारी कुणालाच राहिली नाही. याचं मला कितीही वाईट वाटल तरीही हेच वास्तव आहे ज्यात आपण जगत आहोत. सोशल मीडियाचा विषारी किंवा नकारात्मक प्रभाव हा सकारात्मक प्रभावापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं.
पुढे म्हणाले, माझं नाव खान आहे आणि म्हणूनच मला सांगितले जातं की ‘पाकिस्तानात जा’. जेव्हा मी एकदा पाकिस्तानात गेलो, तेव्हा लष्करने (दहशतवादी संघटना) भारतात परत जाण्यास सांगितलं. त्यामुळे मी इथेही नाही आणि तिकडेही नाही. जर तुम्ही एखादी कथा दाखवत असाल तर त्यावरून अनेक भावना जागृत होतात आणि ते ठीक आहे”. कारण ज्याचा त्याचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असायला हवा आणि तो आपण मान्य करायलाच हवा.
पुढे, “आपण कधी कधी चित्रपटात तिरंगा दाखवतो पण आज देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. राष्ट्रवादासाठी कधीकधी आपल्याला व्हिलन किंवा काऊंटर पॉईंटची गरज असते. पण देशभक्तीसाठी अशा कोणत्याही गोष्टीची गरज नसते. देशभक्ती म्हणजे तुमच्या देशासाठी असलेलं निव्वळ प्रेम”.