Take a fresh look at your lifestyle.

‘सरसेनापती हंबीरराव’चं चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचा बहुमान मिळवला तो हंबीरराव मोहिते यांनी. त्यांचे शौर्य अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीला ठाऊक आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच प्रविण तरडे रुपेरी पडद्यावर उतरवणार आहेत. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये रांगडा पेहराव आणि पिळदार शरीरयष्टी यासोबतच हातात असिका तलवार घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते दिसत आहेत. मावळतीच्या सूर्याच्या दिशेने उभे असलेले हंबीरराव एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात. त्यांच्या हातात असलेल्या दुधारी तलवारीच्या पातीला लागलेले रक्त बघता एका झुंजार सरसेनापतीचा धगधगता इतिहास प्रेक्षकांसमोर समोर येणार हे निश्चित. ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहिलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असून या नव्या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा सुद्धा वाढली आहे.

दरम्यान,सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी लिहिले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा एक भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे