Take a fresh look at your lifestyle.

अस्सल ‘नटसम्राट’ पडद्याआड! जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा देहांत

0
टीम, हॅलो बॉलीवूड । जेष्ठ आणि प्रख्यात अभिनेते श्रीराम लागू यांचे मंगळवारी वयाच्या 92 व्या वर्षी पुण्यात निधन झाले. ते गेला काही काळ आजारी होते. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
चित्रपट अभिनेत्यासोबतच ते प्रसिद्ध थिएटर कलाकारही होते. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची बरीच मोठी जडणघडण जवळून पाहिली. प्रसिद्ध ‘पिंजरा’, पहिला मराठी रंगीत चित्रपट होता. यातली शिक्षकाची भूमिका महाराष्ट्रभर गाजली. किमान महाराष्ट्रात तरी त्यांना प्रत्येक घराघरात ओळखलं जातं. त्यांचा ‘नटसम्राट’ आजही बाकी सर्व नटसम्राटांसमोर ४ बोटं उंच दिसतो.
श्रीराम लागू यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत १०० हून अधिक हिंदी आणि 40 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या कारकीर्दीत डॉ. लागू ‘विचित्र कथा’, ‘पिंजरा’, ‘मेरे साथ चल’, ‘सामना’, ‘दौलत’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसले. १९८८ मध्ये डॉ. लागू यांना ‘घरौंदा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला.
‘नटसम्राट’ या प्रसिद्ध नाटकाचे पहिले नायक डॉ. लागू हेच होते. ते नाटक प्रसिद्ध लेखक कुसुमाग्रांनी लिहिले होते. या नाटकातील त्यांचा अभिनय आजही आठवतो. मराठी रंगभूमीसाठी मैलाचा दगड ठरलेल्या ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारली. या नाटकातील चमकदार अभिनयानंतर त्यांना ‘नटसम्राट’च म्हटले गेले. अभिनेता नसरुद्दीन शाह एकदा म्हणाले होते की लागूंचे ‘लमाण’ हे आत्मचरित्र कोणत्याही अभिनेत्यासाठी बायबलसारखे आहे.
डॉ. लागूंच्या जाण्याने आपल्या भारतीय चित्रपटसुष्टीला लहानपणापासून पाहिलेली पिढीच संपली असं वाटू लागलंय. त्यांच्या कलेतील योगदानासाठी आणि त्यांच्या पट्टीच्या पण सहज अभिनयाने आमचं मनोरंजन करण्यासाठी सर्व चित्रपट आणि नाटक रसिकांकडून लाख लाख नम्र अभिवादन. थॅंक्यु लागू सर, तुम्ही कायमच पडदयासोबतच आमच्या मनातही जिवंत राहाल.

Leave A Reply

Your email address will not be published.