Take a fresh look at your lifestyle.

सरोज खान यांची सुशांतसिंग राजपूतबाबतची ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची…

मुंबई । बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिगदर्शक सरोज खान यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पुन्हा एका कलाकाराच्या जाण्याच्या दुःखात बॉलिवूड मध्ये दुःखाचे वातावरण आहे. कार्डियाक अरेस्टमुळे सरोज खान यांचे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. गेल्या १५ दिवसांपासून त्या श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात होत्या. आज सकाळी त्यांनी वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या इंस्टाग्रामवरील शेवटच्या पोस्टची चर्चा होते आहे.

जून महिन्यात मृत्यू झालेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला श्रद्धांजली देत त्यांनी ही पोस्ट केली आहे. ‘मी सुशांतसोबत कधीच काम केले नव्हते. पण आम्ही अनेकदा भेटलो होतो. तुझ्या आयुष्यात काय चुकीचे सुरु होते? तू एवढे कठोर पाऊल उचलल्याबद्दल मला धक्का बसला आहे. तू तुझ्या वरिष्ठांशी बोलू शकला असतास त्यांनी तुला मदत केली असती. आणि तुझ्याकडे पाहत आम्हालाही आनंदी ठेवले असते.’ अशी पोस्ट त्यांनी केली होती.

 

सरोज खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव होते. एक दो तीन… हमको आज कल है इंतजार… चोली के पिछे क्या है… निंबुडा निंबुडा… डोला रे डोला… या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केलेल्या सरोज खान यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. कलंक हा त्यांनी नृत्यदिगदर्शित केलेला शेवटचा सिनेमा होय.