Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद..! सोनू सूदची टीम अर्ध्या रात्रीही ऑन ड्युटी; वाचवले २२ रूग्णांचे प्राण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाची दुसरी लाट अधिकच भयंकर होऊ लागली आहे. रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन व रूग्णालयातील बेड्सअभावी लोकांना जीव गमवावा लागतोय. अशा भीषण काळात अभिनेता सोनू सूद कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मदत करताना दिसतोय. त्याची संपूर्ण टीम अतोनात कष्ट करीत लोकांच्या मदतीसाठी तत्पर दिसतेय. असाच एक मदतीसाठी मध्यरात्री फोन आला आणि सोनूची टीम तात्काळ मदतीसाठी ऑन ड्युटी हजर झाली. इतकेच नव्हे तर २२ रुग्णांचे प्राण त्यांनी वाचविले. सध्या सर्व स्तरांवर या कामगिरीसाठी या संपूर्ण टीमचे कौतुक केले जात आहे.

काल मंगळवारी बेंगळुरातील २२ कोरोना रूग्णांना जीवनदान मिळाले. ह्याचे श्रेय सोनू सूद व त्याच्या टीमला पूर्णपणे समर्पित आहे.  अर्ध्यारात्री बेंगळुरातील एआरएके रूग्णालयात बिकट स्थिती उद्भवली होती. अचानक ऑक्सिजन संपल्यामुळे येथे दाखल असलेल्या अनेक रूग्णांचे जीव धोक्यात आले. ही माहिती कळताच सोनू व त्याच्या टीमने काळ वेळ न पाहता क्षणाचाही विलंब न करता कामाला लागली. अगदी काही तासांतच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १५ ऑक्सिजन सिलिंडर रूग्णालयात पोहोचले.

रिपोर्टनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनूच्या टीममधील एका सदस्याला येलाहंका भागातील इन्स्पेक्टर एमआर सत्यनारायण यांनी फोन केला होता. एआरएके रूग्णालयाची स्थिती बिकट आहे. मदत हवी आहे. ऑक्सिजनअभावी आधीच दोन रूग्णांचा जीव गेला आहे, असे त्यांनी सांगितले. यानंतर सोनू सूदच्या टीमने अर्ध्या रात्री आपल्या सर्व कंत्राटदारांना झोपेतून उठवले आणि काही तासांतच १५ ऑक्सिजन सिलिंडर रूग्णालयात दाखल केले.

सोनू सूदने याबद्दल सांगितले. ‘ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही त्या रूग्णांचे प्राण वाचवू शकलो, यासारखे मोठे समाधान नाही. हे उत्तम टीमवर्कचे उदाहरण आहे. शिवाय देशवासियांच्या मदतीचा इच्छाशक्तीचा परिणाम आहे. सत्यनारायणजींचा फोन येताच आम्ही कन्फर्म केले आणि कामाला लागलो. या कामी मदत करणा-या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या टीमचेही मी आभार मानतो. त्यांचा मला अभिमान आहे,’ असे तो म्हणाला.