Take a fresh look at your lifestyle.

सुशांतची ‘ती’ अट ठरली शेवटची; फराह खान य‍ांनी सांगितली आठवण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । १४ जून रोजी मृत्यू झालेला बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या सिनेमामधून नेहमीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे. त्याचा दिल बेचारा हा सिनेमा २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. लवकरच चित्रपटाचं टायटल ट्रॅकदेखील प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानिमित्ताने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खानने या गाण्याशी निगडीत सुशांतची एक आठवण शेअर केली आहे. हे टायटल ट्रॅक करण्यापूर्वी सुशांतने तिच्यासमोर एक अट ठेवल्याचं तिने म्हटलं आहे. ती त्याची शेवटची अट ठरली असल्याचे ती सांगते आहे.

हे गाणं आम्ही केवळ एका दिवसात शूट केलं असून सुशांतने एका टेकमध्ये ते पूर्ण केलं होतं. परंतु, त्याबदल्यात त्याने एक अट ठेवली होती. मात्र त्याची ही अट अखेरची ठरली, असं फराहने एका मुलाखतीत सांगितलं. “हे गाणं माझ्यासाठी अत्यंत जवळच आहे. कारण पहिल्यांदाच मी सुशांतसाठी ते कोरिओग्राफ केलं होतं. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. परंतु, एकत्र काम करण्याची कधीच संधी मिळाली नव्हती. हे गाणं एका शॉटमध्ये चित्रीत व्हावं अशी माझी इच्छा होती, कारण मला सुशांतवर पूर्ण विश्वास होतो, त्यालाच हे करणं शक्य आहे”, असे सांगत ती पुढे म्हणाली, “आम्ही दिवसभर या गाण्याचा सराव केला आणि अर्ध्या दिवसातच हे गाणं तयार झालं होतं. मात्र हे गाणं उत्तमरित्या सादर करण्यासाठी सुशांतने माझ्यासमोर एक अट ठेवली होती. तो म्हणाला होता. हे गाणं मी एका टेकमध्ये पूर्ण करेन. पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. त्याबदल्यात मला तुझ्या घरी जेवायला बोलवावं लागेल”  सुशांतने ही शेवटची अट माझ्यासमोर ठेवली होती.

त्याच्या या अटीनुसार मी त्याला घरी जेवायला बोलावले होते असे फराह म्हणाली. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर त्याच्या मित्रपरिवारातील अनेकांनी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये एकच खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा अखेरचा चित्रपट आहे.