Take a fresh look at your lifestyle.

‘तान्हाजी’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलिज…

0

चंदेरी दुनिया । ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या प्रद्रशनासाठी आता फार कमी दिवस उरलेले असतानाच चित्रपटाची आणखी एक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महाराजांच्या स्वराज्यावर परकीयांचा डोळा असतानाही कशा प्रकारे वीर मावळ्यांनी मोठ्या धीराने आणि चतुराईने या परिस्थितीचा सामना करत मातृभूमीसाठी प्राण पणाला लावले होते याची झलक चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील प्रत्येक पात्राची भूमिका अधिक जास्त सखोल पद्धतीने या ट्रेलरमध्ये उलगडली गेली आहे. त्यामुळे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्याविषयी जाणून घेण्यासाठीचं कुतूहल आणखील वाढत आहे. कोंढाण्यावर शत्रूची नजर नेमकी कशी पडली आणि त्यावर चाल करुन येण्यासाठी कशाप्रकारे कट रचण्यात आला हेसुद्धा या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये समोर येत आहे. त्यामुळे एका ऐतिहासिक कालखंडातील ही घटना कशा प्रकारे इतिहास बदलून गेली असा उत्स्फूर्त प्रश्नही सर्वांच्याच मनात निर्माण होत आहे.

स्वराज्यातील एका अद्वितीय मोहिमेचीच ही कथा असल्यामुळे त्यात साहसी दृश्य पाहायला मिळणार हे अपेक्षित आहे. त्याचाच प्रत्यय हा ट्रेलर पाहताना येत आहे. जबरदस्त संवाद आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं….’ हे सारंकाही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी कायमच प्रेरणा देणाऱ्या जिजाऊसुद्धा या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अजय देवगन, काजोल, शरद केळकर, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि इतरही अनेक कलाकार यांची फौज घेऊन ओम राऊतने ‘तान्हाजी’ साकारला आहे. तेव्हा आता ही पराक्रमाची गाथा बॉक्स ऑफिसवरही गाजते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=6oRSN0EKPh4

Leave A Reply

Your email address will not be published.