Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत आता सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी सिसोदिया यांनी सांगितले. त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आणि किती बेडची आवश्यकता असेल याची माहिती दिली.

१५ जूनपर्यंत दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ही ४४ हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा ३० जूनपर्यंत वाढून १ लाखपर्यंत जाऊ शकतो. आणि १५ जुलैपर्यंत दिल्लीत करोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर ३१ जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असं सिसोदिया म्हणाले. कोरोना विषाणूमुळे दिल्लीकरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या कोरोना चाचणीमध्ये २७% रुग्ण हे कोरोनाग्रस्त सापडले आहेत.  दिल्लीतील रुग्णसंख्या आता ३० हजारांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवर उपचार केले पाहिजेत असा निर्णय  घेण्यात आला होता. हा निर्णय दिल्लीच्या नायब राज्यपालांनी रद्द केला आहे. राज्यपाल अनिल बैजल यांना यावर विचार करण्यास विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला आहे. या एकूण आकड्यांमुळे दिल्लीकरांना आता काळजी घेणे आवश्यक आहे.