Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडनंतर आता टेलिव्हिजन विश्वालाही धक्का, ‘या’ अभिनेत्याने केली आत्महत्या 

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असले तरी अनेक गोष्टींची उत्तरे अनुत्तरीतच राहिली आहेत. सुशांतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये वादळ आले असताना आता टेलिव्हिजन विश्वातील अभिनेता सुशील गौडा या अभिनेत्याने त्याच्या मूळगावी मंड्या येथे आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. तो कन्नड टेलिव्हिजन विश्वात काम करत होता.

सुशीलच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अचानक अशा आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबासमवेत त्याचे निकटवर्तीय तसेच चाहते यांना धक्का बसला आहे.सुशीलचे वय हे केवळ ३० वर्षे इतके होते. इतक्या लहान वयात त्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  ‘अंतपूरा’ या रोमँटिक मालिकेमध्ये त्याने काम केले होते. काल ७ जुलै रोजी त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच सुशील फिटनेस ट्रेनर आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी मेहनत करत होता.

तो आगामी सालगा या चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता. अभिनेता दुनिया विजय या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. सुशीलच्या आत्महत्येनंतर विजयने दु:ख व्यक्त केले आहे.सोशल मीडियावर विजय ने  शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला तो हिरो मटेरियल वाटला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो खूप लवकर सोडून गेला. कोणतीही समस्या असेल तरी त्याचे उत्तर आत्महत्या करणे असू शकत नाही. मला असं वाटतंय की यावर्षी मृत्यूचे सत्र सुरूच राहील. हे केवळ कोरोना व्हायरसमुळे नाही , लोकांचा विश्वास कमी होतो आहे कारण त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. अशावेळी धीराने राहणे आवश्यक आहे’.