Take a fresh look at your lifestyle.

झी स्टुडिओजला अमेय खोपकरांचा ‘दे धक्का’!

मराठी सृष्टी । मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने सजलेल्या आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या चित्रपटाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

   अमेय खोपकर ‘दे धक्का २’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे त्यांनी झी स्टुडिओला खऱ्या अर्थाने धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली होती. त्यामुळे या चित्रपटाचे हक्क झीकडे होते. हे हक्क झीकडे असल्यामुळे ‘दे धक्का २’ची निर्मिती अमेय खोपकर इंटरटेन्मेंटला करता येणार नाही, असं झीचं स्पष्ट मत होतं. याचकारणास्तव झी स्टुडिओ आणि अमेय खोपकर इंटरटेन्मेंट यांच्यात वाद होऊन हा वाद सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयाने झीचा दावा फेटाळून लावत ‘दे धक्का २’च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले. त्यामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला ‘दे धक्का २’ या चित्रपटाची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. “न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, तसेच ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या टीमचे त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी अभिनंदन करतो”, असं अमेय खोपकर म्हणाले.

   हॉलिवूडमधील २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर ‘दे धक्का’ आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. त्यानंतर आता लवकरच दे धक्का २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.