Take a fresh look at your lifestyle.

अभिमानास्पद!!!!डॉक्टर डॉन’ची सुद्धा करोना योद्धयांना मदत!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण अनलॉक प्रक्रिया सुरु होताच सरकारने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली. त्यासाठी काही नियम आखण्यात आले. आता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे ‘झी युवा’वरील ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात करोना योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये, हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. मालिकेत पाहायला मिळत असलेले हे हॉस्पिटल, यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. मीरा-भाईंदर परिसरात ‘डॉक्टरडॉन’ या मालिकेतील हॉस्पिटलचे चित्रीकरण करण्यात येत होते. या महापालिकेला, कोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही.

करोना विरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट, महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. मालिकेत गोंधळ, धमाल आणि मजामस्तीचा केंद्रबिंदू ठरणारा हा सेट, यापुढे करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.